ABOUT US
साई-स्मृति
ज्यावेळी गुरूंना ईश्वरप्रेरित कार्य करावयाचे असते त्यावेळी त्यांचा त्या कार्याबद्दलचा आराखडा ठरलेला असतो. मानवजातीच्या कल्याणार्थ हा एक योग असतो. योग व योगायोग या दोन शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. योगामध्ये ठामपणा असतो. त्यामध्ये ईश्वराची इच्छा असते. त्यातून इतरांच्या कल्याणार्थ काहीतरी घडणार हे निश्चित असते. योगायोगामध्ये कोणत्याही प्रकारची निश्चितता नसते. त्यातून वेगळे असे काहीच निष्पन्न होत नाही. असाच योग 'साई स्मृति'च्या दादांच्या मान्यतेत घडून आला होता. जोगेश्वरीत आज ज्या ठिकाणी 'साई-स्मृति'चे स्थान आहे ती भूमी पवित्र पावन अशीच आहे. या ठिकाणी पूर्वी टाकीमहाराज नावाचे एक थोर संत होऊन गेले. त्यांनी या परिसरात 'सद्भक्ती मंदिर' हे दत्तांचे स्थान स्थापन केले आहे, तसेच रामेश्वर मंदिर या शंकराच्या मंदिराची स्थापनाही त्यांनीच केली आहे. या मंदिरातल्या शिवलिंगाची स्थापनाही त्यांच्याच हस्ते झालेली आहे. या दोन्ही ठिकाणी रोजची पूजाअर्चा, आरती, भजन इत्यादी चालूच असते. अशा या पावन भूमीवर आपले गुरू श्रीसाईनाथमहाराज यांचे स्थान असावे असे दादांना मनोमन वाटले असेल म्हणूनच 'साई-स्मृति' या केंद्रासाठी त्यांनी जोगेश्वरीतील या भूमीची निवड केली.
'साई-स्मृति' या केंद्रासाठी दादांनी देवाच्या कट्ट्यावर जमिनीत पुरण्यासाठी एक श्रीफळ अभिमंत्रित करून दिले होते. हे श्रीफळ पूर्वी वान्द्रे येथे असलेल्या 'लक्ष्मीनारायण निवास' या केंद्रावर पूजेत ठेवण्यात आले होते. 'साई-स्मृति'च्या स्थापनेच्या दिवशी दादांनी दिलेले हे शक्तिस्वरूप श्रीफळ देवाच्या कट्ट्यावर जमिनीत पुरून त्यावर दादांनीच दिलेली इटालियन मार्बलची फरशी बसविली आहे. या फरशीवर दादांच्याच आज्ञेने लाल अक्षराने '॥ॐ श्री साईनाथाय नमः ।।' हे श्रीसद्गुरू नामस्मरण कोरण्यात आले आहे. हे सर्व घडण्यापूर्वी आमच्या या वास्तूत केंद्र व्हावे म्हणून दादांनी एक श्रीफळ मला दिले होते. हे श्रीफळ अजूनही माझ्या पूजनात आहे. ही घटना अतिशय रंजक आहे. अनेक वेळा आपण आपल्या गुरूंकडे काही क्षुल्लक ऐहिकाची याचना करतो; परंतु गुरूंना पुढे घडणाऱ्या घटना स्पष्टपणे दिसत असल्यामुळे त्या लक्षात घेऊन गुरू आपल्याला प्रसाद देतात. आपली क्षुल्लक याचना केवळ निमित्तमात्र असते. अशीच एक घटना 'साई-स्मृति' या केंद्राबाबतीतही घडली. ही घटना अतिशय रंजक व अनाकलनीय असल्यामुळे मी उद्धृत करीत आहे.
एकोणीसशे एकाहत्तर (१९७१) सालची घटना. त्यावेळी मी प्रसूतीतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय प्रॅक्टीस करीत होतो. त्याच सुमारास मी एका औषधांच्या कंपनीमध्ये मेडिकल अॅडव्हायझर म्हणूनही काम करीत होतो. त्या कंपनीचे एक नवीन औषध बाजारात येणार होते. त्या औषधाची संपूर्ण माहिती देणारी पुस्तिका काढण्याचे काम कंपनीने माझ्यावर सोपविले होते. ते काम माझ्या हातून सुबकपणे पार पडावे म्हणून दादांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी वान्द्रे कार्यकेंद्रावर कामकाजासाठी नाव दिले. कामकाजाच्या दिवशी मी दादांना प्रश्न केला की, "मला औषधाची माहिती देणारी पुस्तिका कंपनीतर्फे लिहावयाची आहे. ते लिखाण योग्य रीतीने पूर्ण व्हावे यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे." त्यावर काहीही न बोलता दादांनी एक अभिमंत्रित श्रीफळ हातात घेतले. ते धूपविले व क्षणभर डोळे मिटून प्रार्थना केली. ते श्रीफळ माझ्या हाती देत ते म्हणाले, "हे श्रीफळ कायम पूजेत ठेव." दादांचा आशीर्वाद श्रीफळाच्या स्वरूपात कायमस्वरूपी घरात आला म्हणून मला अतिशय आनंद झाला. एवढ्यात माझ्या मनात एक कल्पना आली की, जर दादांनी दिलेला हा प्रसाद आपण तांब्याचे कवच करून त्यात ठेवला तर तो जास्त सुरक्षित राहील. मी ती कल्पना दादांना सांगितली व त्यांना विचारले की, "या श्रीफळासाठी तांब्याचे कवच केले तर चालेल का? कारण त्यामुळे हा प्रसाद सुरक्षित राहील." दादांनी यासाठी होकार दिला. मी तो प्रसाद घेऊन आनंदाने घरी आलो. खरे तर दादांनी मला हा प्रसाद दिला त्यात त्यांनी काय अंतर्भूत केले होते ते मला त्यावेळी मुळीच कळले नाही. त्या प्रसादाचा मूळ उद्देश मला साधारणतः बारा वर्षांनंतर कळला. दादांनी सांगितल्याप्रमाणे त्या प्रसादासाठी मी तांब्याचे कवच करावयाचे ठरविले. मुंबईमध्ये तांबाकाटा नावाचा एक विभाग आहे. त्या ठिकाणी तांबे व पितळेचे अनेक प्रकार व वस्तू मिळतात. त्या ठिकाणी एका प्रख्यात दुकानदाराकडे आम्ही गेलो. आम्ही श्रीफळाचे दोरीने माप घेतले होते. त्या दुकानदाराला आम्हाला काय पाहिजे ते आम्ही सांगितले व दोरीचे मापही दिले, पण तो दुकानदार म्हणाला की प्रत्यक्ष श्रीफळ घेऊन आल्याशिवाय कवच करणे शक्य होणार नाही. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी आम्ही श्रीफळ घेऊन पुन्हा त्या दुकानदाराकडे गेलो. त्याने त्याच्या पद्धतीने श्रीफळाचे माप घेऊन आम्हाला ते श्रीफळ परत केले व कवच घेऊन जाण्यासाठी चार दिवसांनी परत बोलावले. चार दिवसांनंतर आम्ही ते तांब्याचे कवच घेऊन घरी परत आलो. दादांनी दिलेले श्रीफळ त्या तांब्याच्या कवचामध्ये घालून मी पूजनात ठेवले. त्यानंतर दादा मुंबईला पुन्हा कामकाजाला आले. त्यावेळी मी करून आणलेल्या तांब्याच्या कवचाबद्दल सांगितले. त्यावर दादांनी ते श्रीफळ व कवच दोन्ही केंद्रावर घेऊन येण्यास सांगितले. दुसरे दिवशी मी ते श्रीफळ व त्याचे कवच घेऊन केंद्रावर गेलो. दादांनी ते आपल्या हातात घेतले व धुपवून परत दिले. श्रीफळ व कवच घेऊन मी घरी आलो. ते श्रीफळ पूजनात ठेवले. आजही जवळजवळ चाळीस वर्षांनंतर ते श्रीफळ माझ्या पूजनात आहे. त्या श्रीफळाचे महत्त्वही अथांग व अनंत आहे. हे श्रीफळ दिल्यावर काही वर्षांनी दादांनी जोगेश्वरी येथील आमच्या घरी छोटी छोटी साधनासंमेलने घेण्यास सुरुवात केली. प्रत्येक संमेलन पाच ते दहा दिवस चालत असे. त्यावेळी दादांचा मुक्काम मुंबईतच असे. या संमेलनांना मुंबईचे तसेच मुंबईबाहेर राहणारे भक्तभाविकही आवर्जून येत असत. याच सुमारास आमच्या घरासमोरच्या प्लॉटमध्ये आज जिथे 'साई-स्मृति' केंद्र आहे, त्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले होते. इमारतीचा पाया घातला जात होता. जोगेश्वरीतील छोटी संमेलने चालू असताना व समोरच्या इमारतीचे बांधकाम चालू असताना बेळगावचे एक गुरुबंधू एका संमेलनाला उपस्थित होते. ते दादांच्या बरोबरच दादरला 'हेमकुंज' येथे राहत होते. दादांच्याच अॅम्बॅसेडर कारमधून जोगेश्वरीला संमेलनाला येत होते. एके दिवशी बेळगावचे हे गुरुबंधू माझ्याकडे आले व मला म्हणाले की, "तुम्हाला काही वर्षांपूर्वी दादांनी श्रीफळ दिले होते व तुम्ही ते श्रीफळ तांब्याच्या कवचात घालून पूजनात ठेवले आहे. मला ते श्रीफळ बघावयाचे आहे.” हे गुरुबंधू प्रथमच माझ्या घरी आले होते. तेव्हा अनेक वर्षांपूर्वी दादांनी दिलेल्या श्रीफळाबद्दल यांना कसे कळले असा मला प्रश्न पडला. मी त्यांना विचारले की, "या श्रीफळाबद्दल तुम्हाला कुणी सांगितले? व तुम्हाला कशासाठी बघावयाचे आहे?" त्यावर ते म्हणाले की, "प्रथम तुम्ही मला ते कवच घालून ठेवलेले श्रीफळ दाखवा, मग मी तुम्हाला पुढचे सांगेन." त्याप्रमाणे मी त्यांना तळमजल्यावर असलेल्या माझ्या देवघरात घेऊन गेलो व दादांनी काही वर्षांपूर्वी दिलेला व तांब्याच्या कवचात घालून ठेवलेला प्रसाद दाखविला. त्यांनी मनोभावे त्या प्रसादाला नमस्कार केला. नंतर ते मला म्हणाले की, "काल इथली मुलाखत संपवून आम्ही 'हेमकुंज'ला गेलो. तिथे दादांबरोबर गप्पा मारत असताना दादा म्हणाले की, "जोगेश्वरी येथे डॉक्टरांच्या घरी मला कार्यकेंद्र स्थापन करावयाचे आहे. काही वर्षांपूर्वी ते वान्द्रे केंद्रावर लिखाणासाठी माझा आशीर्वाद घेण्यास आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे केंद्र व्हावे म्हणून मी त्यांना श्रीफळ दिले होते. त्यांनी ते तांब्याच्या कवचात घालून पूजनात ठेवले आहे. त्यांना कल्पनाही नाही की, ते श्रीफळ मी त्यांना त्यांच्या वास्तूत केंद्र व्हावे म्हणून दिले आहे." त्यांचे हे उद्गार ऐकून मी चक्रावलो. मला अतिशय आनंद झाला, पण केंद्राची जागा कुठे असेल या संभ्रमात मी होतो. याच वेळी मला अशीही जाणीव झाली की, आपण श्रीगुरूंजवळ अतिशय क्षुल्लक अशी याचना करतो; परंतु गुरू तुमच्याकडे त्यांचा व्यापक आशीर्वाद अशा तन्हेने प्रवाहित करतात की, तुम्हाला त्याची जाणीवही नसते. गुरूंच्या या व्यापक आशीर्वादाने आपले जीवन पूर्णतः प्रकाशमान झालेले असते. दादांनी दिलेल्या या प्रसादामुळेच 'साई-स्मृति' हे केंद्र उभे राहिले. त्यांच्याच कृपाशीर्वादाने ते केंद्र त्यांना अभिप्रेत असलेले कार्य करीत मोठ्या दिमाखाने त्यांची आठवण करून देत आहे. एवढेच नव्हे तर जे लिखाण माझ्या हातून त्यांनी करविले ती केवळ त्यांचीच कृपा आहे. त्याबद्दल मी त्यांचा निरंतर ऋणी आहे.
'साई स्मृति' ज्या इमारतीत आहे त्या इमारतीचे काम चालू असताना आमच्या घरी दादांच्या मुलाखती होत असत. एकदा खिडकीतून दादांनी या इमारतीचा पाया बघितला व मला त्यांनी तळमजल्यावरचे दोन्ही फ्लॅटस् घेण्यास सांगितले. सुदैवाने या इमारतीतील हे दोनच फ्लॅटस् नोंदणी न झाल्यामुळे रिकामे होते. गुरुआज्ञेप्रमाणे हे दोन्ही फ्लॅट्स मी माझ्या पत्नीच्या नावे विकत घेतले. त्यानंतर एकदा 'द्वारकामाई'त दादांनी मुलाखत घेत असताना जोगेश्वरी येथील ही जागा कुटुंबातील सर्वांची परवानगी घेऊन कार्यासाठी देशील का? असे मला विचारले. त्यावेळी आम्ही सर्वांनी ही जागा आनंदाने कार्यासाठी देण्याचे ठरविले व तसे दादांना कळविले. त्याच वेळी एका गुरुभक्ताने बोरिवली येथे मोठी जागा घेण्यासाठी दादांना विनंती केली होती. त्यावेळी 'द्वारकामाई' येथे दादांनी काढलेले उद्गार आवर्जून उद्धृत करावेसे वाटतात. ते म्हणाले होते की, "प्रशस्त जागेपेक्षा ज्या जागेमध्ये श्रद्धा, भक्ती आणि प्रेम या भावना वास करतात तीच जागा मला पसंत आहे आणि त्याच जागेत बाबांचे वास्तव्य होणार आहे." पुढे एका गुरुभगिनीस लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, "मुंबईत जोगेश्वरी येथे कार्यकेंद्रासाठी मी जागा बघितली आहे व तेथेच मी वास्तव्यास जाणार आहे." या सर्व घटनांमधून हेच सिद्ध होते की, 'साई स्मृति' येथे वास्तव्य करण्याचे दादांनी पूर्वीच ठरविले होते. दादांचे वास्तव्य 'साई स्मृति' येथे निरंतर व अखंड आहे हे निःसंशय !
दादांनी आपल्या हयातीत एक श्रीफळ जोगेश्वरी येथील केंद्रावर ठेवण्यास दिले होते. त्याचप्रमाणे एक इटालियन मार्बलची (संगमरवरी) फरशी 'साई स्मृति' या मुंबई केंद्रासाठी राखून ठेवली होती. त्यावेळी त्यांनी असेही सांगितले होते की, ज्यावेळी 'साई स्मृति' जोगेश्वरी येथील मुंबई केंद्राचे उद्घाटन होईल त्यावेळी जेथे बाबांचा फोटो ठेवण्यात येईल त्या कट्ट्यावर जमिनीमध्ये हे श्रीफळ ठेवून त्यावर संगमरवरी दगडाची फरशी 'ॐ श्री साईनाथाय नमः' ही अक्षरे त्यावर कोरून, त्या श्रीफळावर बसविण्यात यावी. त्याप्रमाणे 'साई स्मृति'च्या उद्घाटनाच्या दिवशी ते श्रीफळ दादा-बाबांच्या कट्ट्यावर जमिनीच्या आत ठेवून त्यावर श्री सद्गुरुनामस्मरणाची फरशी बसवून, ती पोकळी बंद करण्यात आली. किंबहुना पुढील घटना लक्षात घेऊनच दादांनी आपल्या शक्तीचे हे श्रीफळ जमिनीत ठेवून, लय तत्त्वाचे शक्तिपीठ त्या स्थानी स्थापन केले असावे. 'साई स्मृति' हे दादांनीच सूचित केलेले जोगेश्वरी, मुंबई या केंद्राचे नाव आहे.
शक्तिपीठ स्थापनेच्या वेळी दादांनी असे उद्गार काढले होते की, 'साईधाम' ही वास्तू म्हणजे शक्तिपीठाची 'उत्पत्ती' अवस्था; 'द्वारकामाई' पुणे येथील वास्तू ही 'स्थिती' अवस्था आणि मुंबईत ज्या वास्तूचे काम त्यावेळी चालू होते ती 'साई स्मृति' ही शक्तिपीठाची 'लय' अवस्था. या वास्तूमधून बाबांची कीर्ती सबंध विश्वात पसरेल. तसेच या तीन शक्तिपीठातून अखिल विश्वाचे कार्य होईल. गुरूंनी उच्चारलेले वाक्य हे 'ब्रह्मवाक्य' असते. 'साई स्मृति' या दादांनी ठेवलेल्या नावातच ही वास्तू दादांच्या पश्चात होणार हे ठरलेलेच होते. म्हणूनच दादांचे गमन झाल्यावर ज्यावेळी वांद्रे येथील केंद्राची जागा रिकामी करून आपल्या ताब्यात देण्याची त्या जागेच्या मालकाची मागणी झाली त्यावेळी पुन्हा गुरुआज्ञेने महिन्याभरात 'साई स्मृति'चे काम पूर्ण झाले व वांद्रे येथील केंद्र जोगेश्वरी येथे स्थलांतरित करण्यात आले. दादांनी निवडलेल्या 'साई स्मृति'ची वास्तू होऊ नये यासाठी मुंबईतल्या काही जुन्या भक्तांनी बराच प्रयत्न केला. अनेक अडचर्णीचे कारण देऊन त्यांनी दादांच्यामागे हे केंद्र होऊ नये यासाठी सतत तगादा लावला. पुण्याला 'द्वारकामाई' येथे जाऊन हे भक्त पुनः पुन्हा दादांना हे केंद्र होऊ नये यासाठी विनवणी करीत होते. शेवटी त्यांच्या त्रासाला कंटाळून दादा म्हणाले, "ठीक आहे त्याला (मला) तेथे मॅटरनिटी होम काढायला सांगा." खरे तर मला या जागेची हॉस्पिटलसाठी गरज नाही हे दादा मनोमन जाणत होते. हा निरोप जरी मला मिळाला तरी दादांनी देहत्याग करेपर्यंत ही वास्तू विकण्यासाठी प्रयत्न केला असता एकही गिऱ्हाईक मिळाले नाही. याउलट जेव्हा वांद्रे केंद्राची जागा रिकामी करण्याची नोटीस आली आणि जोगेश्वरीच्या जागेबद्दल पुन्हा विचारण्यात आले तेव्हा एका महिन्याच्या आत सर्व परवानगीसकट केंद्रासाठी जागा तयार झाली. दादांनी ठेवलेल्या 'साई स्मृति' या नावाचा संदर्भ त्यावेळी कळला. "साईदादा एकरूप ते विभूती दृष्टीला" या उक्तीप्रमाणे दादा आणि साई एकरूप होते. त्यामुळे 'साई स्मृति' ही वास्तू दादांच्या पश्चातच होणार होती व ती तशी झाली.
'साई स्मृति' वास्तू होण्यासाठी काही अपरिहार्य कारणामुळे बराच वेळ लागला. परंतु दादांच्या पश्चात् केंद्राची वास्तू महिन्याभरात तयार होऊन 'साई स्मृति'चे उद्घाटन झाले त्या दिवशी सर्व सोहळा पार पडल्यावर एका माध्यमाच्या अंगात बाधेचा संचार झाला. त्या बाधेने सांगितले, "फार पूर्वी हा परिसर निर्जन होता. त्यावेळी अंधेरी येथील प्रसूतिगृहात माझी पत्नी बाळंत होऊन तिला मुलगा झाला. एके दिवशी हॉस्पिटलमध्ये तिला भेटून याच वाटेने घरी परतत असताना काही दरोडेखोरांनी मला लुटून माझा या जागेवर खून केला. तेव्हापासून या जागेवर माझ्या अतृप्त आत्म्याचे वास्तव्य आहे. म्हणूनच ही वास्तू घडण्यास माझा अडथळा होत होता. तुमच्या गुरूंच्या कृपेने ही वास्तू आता पूर्ण झाली आहे. तेव्हा मी ठरविले की, येथे कामकाजाला येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला अडथळा करून, त्याला पाडून, त्याची तंगडी मोडून ठेवायची. पण तुमचे गुरू अंतर्ज्ञानी आहेत. त्यांनी आजच्या सोहळ्यानंतर लगेच तुम्हाला आज्ञा केली की, "येथे कामकाज सुरू करण्याआधी पाच आठवडे फक्त ॐकार साधना करा." त्यानंतर दीपकदादांनी त्या बाधेला गुरुचरणी मुक्त होण्याची विनंती केली. त्या माध्यमाचे मस्तक श्रीफळावर ठेवून त्या बाधेला मुक्त केले. श्रीफळ गुरुचरणी ठेवून संध्याकाळी समुद्रात विसर्जन केले गेले. दुसऱ्या दिवसापासून 'साई स्मृति'च्या वास्तूत दररोज पाच आठवडेपर्यंत ॐकार साधना होत होती. पाच आठवड्यानंतर केंद्राचे इतर कार्य पूर्णत्वाने सुरू झाले. 'साई स्मृति' वास्तूला विलंब होण्याचे कारण वरीलप्रमाणे होते. एकदा तर दादांच्या हयातीत या जागेचे काम लवकर व्हावे म्हणून दादांना बांधकाम चालू असलेल्या जागेतून फिरवून आणले होते. त्यावेळी त्या जागेत रेती व सिमेंटच्या गोणी यांचा खच होता. तसेच रस्त्यावरच्या गाईंनीही ही वास्तू आपले आश्रयस्थान केले होते. आज जेव्हा मी या घटनेचा विचार करतो तेव्हा गुरू आपल्या भक्तांचे लाड पुरविण्यासाठी काय करू शकतात हे मनात येऊन गुरुंबद्दलच्या प्रेमाचा गहिवर डोळ्यावाटे पाझरतो.
गुरुकार्य हृदयातील ओलाव्याने करण्यास श्रद्धा, भक्ती आणि प्रेम हे तीन गुण आवश्यक असतात. या भावनेने ज्यावेळी गुरुकार्य केले जाते त्यावेळी गुरूच प्रेमाने आणि वात्सल्याने आपल्याला काही प्रचीती देत असतात. फक्त ती जाणण्याची क्षमता आपणात असावी लागते. पूर्वी एकदा दादांनी असे म्हटले होते की, एखाद्या सोनाराच्या किंवा कासाराच्या दुकानात सोने, चांदी, तांबे व पितळ यांच्या देवदेवतांच्या प्रतिमा एकत्र ढिगाऱ्यात पडलेल्या असतात. त्या जरी देवतांच्या प्रतिमा असल्या तरी त्यांच्यात देवत्व नसते. ज्यावेळी त्यातील एखादी प्रतिमा भक्त आपल्या घरी घेऊन येतो तेव्हा देवदेवतांचे ते एक प्रतीक असते. या प्रतीकाची जेव्हा श्रद्धा, भक्ती, प्रेम या भावनेतून पूजाअर्चा होते त्यावेळी या प्रतीकाची प्रतिमा बनते. त्या प्रतिमेमध्ये भक्तभाविकांच्या सतत श्रद्धेने जेव्हा शक्ती धारण होते त्यावेळी त्या प्रतिमेची प्रतिभा होते. प्रतीकाचे प्रतिभेत स्थित्यंतर झाल्यानंतर त्या प्रतिभेतून वेगवेगळ्या प्रसंगी जे आविष्कार घडतात, त्या आविष्कारांनाच आपण चमत्कार म्हणतो. किंबहुना भक्तांच्या श्रद्धेला देवदेवतांनी किंवा श्रीगुरूंनी दिलेला हा प्रतिसाद असतो. जीवनात अनेक कडू-गोड घटना घडतात. गुरुमार्गात या केवळ घटनाच राहतात. म्हणूनच या घटना कडू किंवा गोड न समजता त्यांना गुरुप्रसाद किंवा गुरुकृपा समजणे ही गुरुमार्गातील अत्युच्च अशी ज्ञानयुक्त भक्ती होय.
